भिवंडीतील विकास आराखडा घरांवर वरवंटा फिरवत असल्यास गप्प बसणार नाही-खा.सुरेश म्हात्रे

भिवंडी महानगरपालिका विकास आराखडा बनविताना धनदांडग्यांना फायदा पोहचविण्याचे काम प्रशासनाने जाणीवपूर्वक केले आहे. पण त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांवर वरवंटा फिरवला जाणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे. शहरातील टेमघर येथील राजेश म्हात्रे यांच्या घराशेजारील रस्ता विकास आराखड्यात छोटा असताना जाणीव पूर्वक विकासकांना फायदा पोहचविण्यासाठी तो रस्ता राजेश म्हात्रे यांच्या घराकडे सरकविण्यात आला आहे. ज्यामुळे राजेश म्हात्रे यांचे घर बाधित होत आहे. याबाबत राजेश म्हात्रे यांनी खा. सुरेश म्हात्रे यांची भेट घेऊन कैफियत मांडल्या नंतर त्यांनी थेट पालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक नितीन जाधव यांना फोन करून भेटी साठी वेळ घेतली. परंतु शुक्रवारी खा. सुरेश म्हात्रे पालिका मुख्यालयात आले असता ते भेटू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थित अजय साबळे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी संतप्त खासदार सुरेश म्हात्रे यांनी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भिवंडी शहर विकास आराखडा कोणाला फायदा देण्यासाठी बनवला त्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. हा
विकास आराखडा दोन वेळा बदलला. कोणाला वाचवायचे असेल तर खुशाल वाचवा पण त्यामुळे कोणाचे घर उध्वस्त होणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा देत अधिकाऱ्यांना फोन करून भेटायला आलो असता ते अनुपस्थित राहिले. ठीक आहे कार्यालयात ते येणारच आहेत ना. तेव्हा त्यांना एखादा सरळ रस्ता जाणीवपूर्वक का वळवण्यात आला याचा जाब नक्की विचारणार, मोठ्या लोकां सोबत व्यवहार करून सर्वसामान्य जनतेला त्रास द्यायचा हा प्रकार आहे अशी प्रतिक्रिया खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.

Scroll to Top