पादचारी उड्डाणपूल व सुरक्षितता उपाययोजना, पायाभूत सुविधांबाबतची मागणी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील
वाहतूक, सुरक्षितता व पायाभूत सुविधांशी संबंधित विविध समस्यांबाबत बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रिक) तथा प्रादेशिक अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन देत विविध मागण्या केल्या असून महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आणून दिल्याआहेत. आमदार तरे यांनी सांगितले की, पालघर तालुक्यातील मौजे हलोली-पाडोसपाडा, तर वसई येथील शिरसाड-भांबटपाडा तसेच ब्रह्मा सेल पेट्रोल पंप परिसरात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वसलेल्या गावांतील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व रुग्णांना रस्ता ओलांडताना मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी पादचारी उड्डाणपूल अथवा सुरक्षित अंडरपासची उभारणी करण्यात यावा. तसेच वसई (ससूनवघर) ते तलासरी (आच्छाड) दरम्यान सविस्तर सर्वेक्षण करून आवश्यक ठिकाणी पादचारी उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता असल्याचे आ. तरे यांनी नमूद केले. याशिवाय महामार्गावरील रस्त्यांची दुरवस्था, असमान पृष्ठभाग, वारंवार होणारी वाहतूक कोंडी, वाढते अपघात, आपत्कालीन सेवांचा अभाव तसेच पादचारी सुरक्षेसाठी आवश्यक सुविधांची कमतरता या गंभीर समस्यांकडेही त्यांनी प्राधिकरणाचे लक्ष वेधले.


