डहाणू – प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रलंबित राहिलेल्या २,१९८ जन्मदाखल्यांचे आदेश तात्काळ मिळावेत या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने डहाणू तहसीलदार कार्यालयावर छेडलेले ठिय्या आंदोलन ऐतिहासिकदृष्ट्या यशस्वी झाले आहे. संघटनेच्या तीव्र रेट्यापुढे नमते घेत प्रशासनाने आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सर्वच्या सर्व प्रलंबित जन्मदाखल्यांचे आदेश आंदोलनकर्त्यांच्या हाती सुपूर्द केले. स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतर अशा प्रकारे एकाच वेळी २ हजारपेक्षा जास्त नागरिकांना दाखले मिळण्याची डहाणूच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ ठरली आहे. हक्काची कागदपत्रांचे वाटप होताच दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षाचे रूपांतर आता विजयाच्या जल्लोषात झाले आहे.
आंदोलनादरम्यान संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी कार्यकर्त्यांना, सभासदांना मार्गदर्शन करत लढ्याला बळ दिले. श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा सचिव कैलास तुंबडा आणि डहाणू तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात झाले होते. कालपासून सुरू झालेले हे आंदोलन पूर्ण रात्रभर आणि आज दुसऱ्या दिवशीही अविरत सुरू होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कमालीची शिस्त पाळली होती. आंदोलनकर्त्यांनी आपल्यासोबत आणलेली लाकडे, फाटे आणि भांडी वापरून तहसीलदार कार्यालय परिसरातच चुली मांडल्या असून तिथेच स्वयंपाक आणि जेवण तयार केले जात होते. संघटनेची पारंपरिक गाणी, घोषणा आणि लोकनृत्य सादर करत त्यांनी आंदोलनाचा उत्साह कायम ठेवला होता.
विशेष म्हणजे, या आंदोलनात आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मातोश्री रजनी पंडित यादेखील प्रत्यक्ष सहभागी झाल्या त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्यासोबतच पालघर, विक्रमगड, जव्हार आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्तेही न्याय मागण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
तालुक्यात जवळपास २,१९८ जन्मदाखल्यांचे अर्ज कार्यालयात प्रलंबित होते. जन्मदाखला वेळेत न मिळाल्याने २,३०० हून अधिक नागरिक आधार कार्डविना शासकीय योजनांपासून वंचित राहिले होते, ज्याला सर्वस्वी तहसीलदार जबाबदार असल्याचा आरोप संघटनेने केला होता. यासोबतच घराखालील जागेसाठी वर्षानुवर्षे सादर केलेले अर्ज तहसीलदार स्तरावर प्रलंबित असून त्यावर तात्काळ निर्णय घेण्याची आणि ‘मनरेगा’ अंतर्गत बांबू लागवडीचे काम केलेल्या मजुरांना गेल्या तीन महिन्यांपासून थकलेली मजुरी त्वरित देण्याची मागणीही संघटनेने लावून धरली होती.
या आंदोलनात पालघर जिल्हा उपाध्यक्ष वसंत पवार, जिल्हा सचिव गणेश उंबरसाडा, पालघर तालुका अध्यक्ष नरेश वरठा, उपाध्यक्ष प्रमिला, तालुका उपाध्यक्ष पिंटू निसकटे, विकास शिंगाडा, आकांक्षा कुंभारे, महेंद्र पाटील, पिंटू बोचल तसेच डहाणू तालुका उपाध्यक्ष जितू पाटील, रामी वेडगा, बाळू झिरवा, मुकुंद करमोडा, ईश्वर वाडू, विलास पवार, छाया वरठा आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन दिवसांच्या अहोरात्र संघर्षानंतर तहसीलदार सुनील कोळी यांनी सर्व प्रलंबित २,१९८ जन्मदाखले मंजूर करून वाटपाचे आदेश ग्रामपंचायतींना देऊन आज आंदोलनात उपस्थित असलेल्या सर्व सभासदांना दाखले ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सुपूर्द केले. हातात हक्काचे दाखले पडल्यानंतर आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू पाहायला मिळाले. संघटनेच्या एकजुटीमुळे मिळालेला हा ऐतिहासिक विजय डहाणू तालुक्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.


