आठवडी बाजार बंद करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की

 कल्याण – आठवडी बाजार तात्काळ बंद करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या  ‘ई’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आंदोलनात महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना (शिंदे) उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण  तालुका प्रमुख गजानन पाटील  यांनी केले. काळूबाई चौक येथून सुरू झालेला मोर्चा ‘ई’ प्रभाग कार्यालयावर धडकला. मात्र केडीएमसीमध्ये शिवसेना सत्तेत असतांना देखील प्रशासनावर अंकुश नसल्याने सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा यामुळे रंगली होती.  

आंदोलनकर्त्यांनी महापालिका हद्दीतील सर्व आठवडी बाजार तात्काळ बंद करण्याची मागणी करत प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला. साप्ताहिक बाजारांमुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले की, गेल्या महिन्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आठवडी बाजार बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. आठवडी बाजारांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

Scroll to Top