मुंबई-नाशिक महामार्गावरील वृक्षारोपणाचा बोगस कारभार

वासिंद परिसरातील झाडे वाळून गेल्याने नागरिक संतप्त

शहापूर – मुंबई-नाशिक महामार्गावरील
वासिंद परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित ठेकेदारांच्या वृक्षारोपण कामांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महामार्गाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असले, तरी या झाडांच्या संवर्धनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र समोर आले आहे. परिणामी अनेक रोपे वाळून गेली असून, शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि बांधकामादरम्यान हजारो झाडांची कत्तल करण्यात आली होती. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि न्यायालयाच्या निर्देशांनुसार तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात अनेक झाडे लावण्याची अट संबंधित यंत्रणांवर घालण्यात आली होती. त्यानुसार महामार्गाच्या दुभाजकात व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

मात्र, प्रत्यक्षात लावलेल्या झाडांना नियमित पाणीपुरवठा, खत व्यवस्थापन किंवा देखभाल केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वासिंद परिसरातील अनेक ठिकाणी रोपे पूर्णपणे वाळून गेल्याचे दिसून येत असून, काही ठिकाणी केवळ झाडे लावल्याचा दिखावा करण्यात आल्याचा आरोप होत आहे. सध्या वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत हरित पट्टा निर्माण करण्यासाठी केले जाणारे वृक्षारोपण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र कोट्यवधी रुपयांचा खर्च करून लावलेली झाडे संवर्धनाअभावी नष्ट होत असतील, तर या कामामागील उद्देशच फोल ठरत असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.


“ठेकेदार केवळ बिल काढण्यासाठी आणि निधी मिळवण्यासाठी वृक्षारोपण करतात का ? झाडांच्या देखभालीसाठी दिलेला निधी नेमका कुठे जातो?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. वृक्षारोपणाच्या कामांसाठी खर्च झालेल्या निधीची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली केवळ कागदोपत्री कामे न करता प्रत्यक्ष झाडे जगविण्यावर भर देणे आवश्यक आहे.


अन्यथा शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या उद्दिष्टालाही मोठा धक्का बसणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Scroll to Top