ठाणे – बाळकुम, ढोकाळी, दोस्ती आदी परिसरात प्रस्तावित ५५ कोटींच्या काँक्रीट रस्त्याच्या कामांची आमदार संजय केळकर यांनी प्रत्यक्ष जेसीबी रस्त्यावर उतरवत रस्त्यांच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडले पाडले.
केंद्र शासनाकडून ठाणे महापालिकेने ६०० कोटींचे बिनव्याजी कर्ज घेतले आहे. या निधींपैकी ५५ कोटी खर्चातून बाळकुम, ढोकाळी, दोस्ती आदी भागात चार काँक्रीट रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहेत. बाळकुम-कोलशेत रोड, दोस्ती वेस्ट काउंटी संकुल ते लोढा अमारा संकुल प्रवेशद्वार क्र. ४, बाळकुम दादलानी रस्ता, अय्यप्पा मंदिरच्या समोर दादलानी रस्ता ते आयलँड हेवन सोसायटीपर्यंतचा रस्ता, बाळकुम रुणवाल गार्डन सिटी रस्ता आणि बाळकुम नाका ते बाळकुम पाडा क्र.३ गणपती विसर्जन घाटापर्यंत, नव्याने भूमिगत फुटपाथ आदी कामांची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली.
या रस्त्यांची पाहणी करताना अनेक त्रुटी आढळून आल्या. रस्त्यांच्या बाजूला असलेल्या पदपथ आणि गटारांची कामे कार्यादेशाप्रमाणे झालेली नसल्याचे आढळून आले. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची भीती श्री. केळकर यांनी व्यक्त करत या रस्त्यांच्या कामाचे ऑडीट व्हीजेटीआयमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली. दोस्ती काउंटी येथील प्रस्तावित सायकल आणि जॉगिंग ट्रॅक प्रत्यक्षात होईल की नाही अशी शंका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. कर्ज घेऊन केलेल्या रस्त्यांची अशी दूरवस्था होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही श्री.केळकर यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
पाहणी दौऱ्यात माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कदम, उप कार्यकारी अभियंता श्री. कुसुरकर, अभियंता श्री. मोरे, भाजपचे संजय पाटील, कैलास म्हात्रे, रविराज रेड्डी, भानुदास भोईर, ॲड. हेमंत म्हात्रे, निलेश पाटील, समीर भोईर, मयूर भोईर, राजेश देशमुख, नीरज काबाडी आदी उपस्थित होते.


