खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडून अबिटघर येथे सुरु असलेल्या जलसंधारण व शेती सुधारणा कामाचे कौतुक

आबिटघर येथे सुरू असलेल्या जलसंधारण शेती सुधारणा कामाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी कौतुक केले आहे.
अबिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे यांच्या विशेष प्रयत्नांतून तसेच एक्रिसाट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील आबिटघर ग्रामपंचायत हद्दीतील साठेपाडा व परिसरात सुरू असलेल्या जलसंधारण व शेती सुधारणा कामांची खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी एक्रिसाटच्या माध्यमातून उभरण्यात आलेल्या अत्याधुनिक हवामान केंद्र तसेच विहरीतील पाण्याच्या पातळ्या तपासण्यासाठी होत असलेल्या प्रयोगाचे तसेच या अभिनव प्रकल्पाचे कौतुक केले. हैदराबादस्थित एक्रिसाट या आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थाचे ग्लोबल रिसर्च प्रोग्राम सेंटरचे संचालक डॉ. रमेश सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत असून मुख्य वैज्ञानिक डॉ. कौशल गर्ग, प्रकल्प प्रमुख डॉ. वेंकट राधा, नागराजू या ख्यातनाम संशोधकांचे मार्गदर्शन लाभत आहे. जलसंधारण, मृदासंधारण आणि शाश्वत शेती विकासाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष कामाची उभारणी करणारे अभियंता कृष्णपाल परमार, शिवकुमारजी, अनिलजी सिंग, अमोल पंडागळे आणि सागर रामदासी यांनी वरिष्ठ संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरपंच साक्षी संतोष साठे यांच्या सहकार्याने या कामांना गती दिली आहे. परिसरातील जलस्रोत वाढविणे, भूजल पातळी उंचावणे आणिxt उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या कामाची प्रगती पाहून खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सरपंच साक्षी संतोष साठे, एक्रिसाटच्या संशोधकांचे पथक तसेच स्थानिक शेतकऱ्यांचे अभिनंदन करत हा प्रकल्प ग्रामीण विकास आणि शाश्वत शेतीसाठी आदर्श ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मोठी मदत होणार असल्याचे म्हटले आहे. या भेटीवेळी उपसरपंच धनश्री दयानंद पाटील, ग्रामपंचायत सदस्या भावना रायात, भरत जाधव, कल्याणी साठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Scroll to Top