मुरबाड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि भविष्यातील पाणी गरजांचा विचार करून मुरबाड नगरपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा योजना टप्पा-२ अंतर्गत प्रभाग क्रमांक १२, माळीपाडा येथे नवीन पाण्याच्या टाकीच्या (जलकुंभ) बांधकामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष मोहन गडगे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
मुरबाड शहरात सुमारे दोन दशकांपूर्वी तीव्र पाणीटंचाईची समस्या होती. महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. मात्र आमदार कथोरे यांनी पाणीपुरवठा योजनांसाठी विशेष प्रयत्न करून शहरातील पाणी समस्या मोठ्या प्रमाणात दूर केली. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध झाला.
सध्या सुरू असलेली पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे कार्यरत असली तरी शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अतिरिक्त जलसाठ्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार किसनजी कथोरे व मुरबाड नगरपंचायत चे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या देखरेखे खाली मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक व उपनगराध्या नम्रता नितीन तेलवणे यांच्या सहकार्याने नवीन जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या जलकुंभाच्या उभारणीमुळे शहरातील पाणी साठवण क्षमता वाढणार असून भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि नियोजनबद्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील नागरिकांना दीर्घकालीन आणि अखंडित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
भूमिपूजन कार्यक्रमास नगरपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी, तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.


