टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागा मार्फत दत्तनगर नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने गांधीनगर येथील धर्मवीर आनंद दिघे समाजमंदिरात विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिबिरात नागरिकांसाठी AI तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक मशिनद्वारे मोफत छातीचा एक्स-रे, क्षयरोग निदानासाठी कफ नमुना तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, आवश्यक उपचार, ABHA (आभा) कार्ड नोंदणी तसेच आयुष्मान भारत योजनेबाबत मार्गदर्शन व नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. टीबीबाबत जनजागृती करून लवकर निदान व उपचाराला प्रोत्साहन देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. यावेळी आमदार राजेश मोरे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना, “टीबी हा उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे आढळल्यास भीती न बाळगता त्वरित तपासणी करून उपचार घ्यावेत. टीबी मुक्त भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य महत्त्वाचे आहे,” असे आवाहन केले. या कार्यक्रमास आमदार राजेश मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला, नगरसेवक राजन मराठे, नगरसेविका दिपाली पाटील, ज्योती मराठे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पौर्णिमा ढाके, वैद्यकीय अधिकारी डॉ. अध्वर्यू गौरकर, डॉ. पानपाटील, डॉ. प्राजक्ता आणि डॉ. प्रीती उपस्थित होत्या.


