प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सन्मान
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘कृषी दिना निमित्त जिल्हा परिषद ठाणे कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बी. जे. हायस्कूल, टेंभी नाका, ठाणे येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजने अंतर्गत लाभार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात २५ प्रगतशील शेतकरी, पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजने अंतर्गत लाभार्थी, शेतकरी-शेतमजूर बचत गट, ग्रामपंचायत स्तरावरील १३ महिला बचत गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांना वावेळी विशेष सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तसेच कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव म्हणाले, ‘शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि समाजजीवनाचा खरा कणा आहे. आज सन्मानित होत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मेहनत, जिद्द आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. बदलत्या हवामान परिस्थितीचा आणि बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड शेतीशी घालणे ही काळाची गरज आहे. पारंपरिक पिकांसोबत फळबाग, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, पशुपालन, प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धित उत्पादनांचा अवलंब केल्यास शेतक-यांचे उत्पन्न अधिक वाढू शकते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आधुनिक, शाश्वत आणिबाजाराभिमुख शेतीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद प्रशासन शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहील. कार्यक्रमादरम्यान भिवंडी तालुक्यातील लाभार्थी महिला शेतकरी ज्योत्स्ना प्रकाश राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, ‘कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही मी शेतीच्या माध्यमातून घराला आधार देण्याचा निर्धार केला.


