भेगा, तडे आणि कोसळण्याच्या भीतीने प्रवाशांत चिंता
कल्याण – मुरबाड-
अहिल्यानगरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील माळशेज घाटात नव्याने करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर आणि काही ठिकाणच्या संरचनांवर भेगा व तडे दिसून आल्याने प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असताना रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे. यापूर्वी २ जून २०१२ रोजी भगवानगड परिसरात झालेल्या भीषण बस अपघातात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही घाटातील धोकादायक वळणे, कोसळण्याच्या स्थितीतील झाडे आणि कमकुवत झालेल्या संरचनांचा प्रश्न कायम असल्याची भावना प्रवासी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, साखळी क्रमांक ७८/०० येथे पॅनलला तडा गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. पावसाचा जोर कमी होताच संबंधित ठिकाणाची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले असून, याबाबत पोलिस प्रशासनालाही सूचना देण्यात आल्याची माहिती मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली आहे.


