डोंबिवली शहर आणि ग्रामीणच्या वीज लपंडावावर आमदार राजेश मोरे यांचा महावितरणला कडक इशारा

डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार व दीर्घ काळाच्या वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. एकदा वीज गेल्यानंतर तब्बल ८ ते १० तास, तर अनेक ठिकाणी १६ तासांपर्यंत वीजपुरवठा होत नसल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी थेट महावितरणच्या कार्यालयात धडक देत कार्यकारी अभियंता जगदीश बोडगे यांच्यासोबत सविस्तर, ठाम व परिणामकारक चर्चा केली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, संपर्कप्रमुख विवेक खामकर,माजी नगरसेवक राजन मराठे, नगरसेवक सूरज मराठे, विधानसभा समन्वयक ओम लोके, विक्रांत शिंदे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार राजेश मोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, डोंबिवली हा १०० टक्के वीजबिल वसुली करणारा परिसर म्हणून ओळखला जातो. तरीही येथील नागरिकांना तासन्तास अंधारात ठेवणे, वारंवार वीजपुरवठा खंडित करणे आणि कोणतेही समाधानकारक नियोजन न करणे, हा महावितरणचा अत्यंत निष्काळजीपणाचा कारभार आहे.

बैठकीत स्मार्ट मीटरच्या विषयावरही तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पूर्वी सुमारे १,००० येणारे वीजबिल ₹१०,००० पर्यंत पोहोचल्याच्या नागरिकांच्या तक्रारी निदर्शनास आणून देत, कुठेही स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी ठाम मागणी करण्यात आली.

Scroll to Top