जून महिन्यात पाऊस लांबला… मात्र १ जुलैपासून अंबरनाथ तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. बारवी धरण परिक्षेत्रात पावसाच्या संतधारेमुळे पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन ४५ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर अंबरनाथच्या चिखलोली धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ होऊन अवघ्या ८ दिवसात ‘ओव्हरफ्लो’ होऊन वाहू लागले आहे. त्यामुळे अंबरनाथ पूर्व भागातील नागरिकांवर उडवलेले पाणीटंचाईचे ग्रहण अखेर सुटल्याने आगामी काळाची पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे.
ठाणे, मुंबईकरांना जवळचे पर्यटन केंद्र म्हणून परिचित असलेले चिखलोली धरण ‘ओव्हरफ्लो’ झाल्यामुळे या भागात दरवर्षीप्रमाणे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र धरण परिसरात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अतिउत्साही पर्यटकांना येथे येण्यास प्रतिबंध केला आहे.
ठाणे जिल्ह्यासह औद्योगिक क्षेत्रास पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ३० जून पर्यंत पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटून २१.७४ टक्क्यांपर्यंत ओसरला होता. त्यामुळे सर्वत्र पाणी चिंता निर्माण झाली होती. दरम्यान पाणी कपातीच्या मार्गावर असताना जुलै च्या पावसाने दिलासा दिला. अवघ्या
तीन दिवसात विक्रमी पावसामुळे बारवी धरणातील पाणीसाठा मंगळवारी ७ जुलै रोजी सकाळी ३५. ८७ टक्क्यांवर पोहोचला. बुधवार ८ जुलै रोजी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात तब्बल २४७.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धुवाधार पावसामुळे अवघ्या एका दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात सुमारे ९ टक्क्यांनी विक्रमी वाढ होऊन सध्या पाणीसाठा ४४.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठा १५१.६४ दशलक्ष घनमीटर इतका असून पाण्याची पातळी ६३. ८० मीटरवर पोहोचली आहे. बारवी धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२. ६० मीटर आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली, तशीच दुसऱ्या आठवड्यात अशाच प्रकारे पावसाने बॅटिंग केली तर बारवी धरण ‘ओव्हरफ्लो’ व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरासह औद्योगिक क्षेत्रात उडवलेले पाणी टंचाईचे संकट आता दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
मागील वर्षीच्या तुलनेत पावसाची नोंद आणि धरणातील पाणी साठाचा आलेख पाहता उतरता होता. मागील वर्षी ८ जुलैला धरणात तब्बल ५९.१२ टक्के म्हणजे २२३. २१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक होता.


