नवी मुंबईत बांधकाम स्थळांवरील डासउत्पत्ती स्थानांवर कार्यवाहीची विशेष मोहीम

नवी मुंबई शहर हे खाडीकिनारी वसलेले सुनियोजीत शहर असून इतर शहरांना रेल्वे व रस्त्याद्वारे नियोजीतपणे जोडलेले आहे. येथील नागरी वसाहत दिवसांदिवस वाढत आहे. तसेच घरांच्या वाढत्या मागणीप्रमाणे नवीन रहिवासी इमारतींची तसेच पुनर्बाधणीची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. बांधकामातील साचलेल्या पाण्यामुळे हिवताप / डेंग्यू यासारख्या आजार पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती होण्याची दाट शक्यता असते, यासाठी सदर ठिकाणी डासउत्पत्ती रोखण्याकरिता नमुंमपामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जातात.

नागरी प्राथमिक आरोग्य केंदाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात आरोग्य विभागामार्फत डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरणाचे काम केले जाते. परंतू यासोबतच पावसाळा कालावधीत घरांतर्गत डासोत्पत्ती स्थाने तपासणी व बांधकामांमध्ये डासअळीनाशक फवारणी यावर विशेष भर दिला जातो. नमुंमपा आरोग्य विभागामार्फत बांधकामाच्या ठिकाणी नियामित साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासअळीनाशक फवारणी केली जाते. 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय असलेल्या बांधकामाच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबईत 270 बांधकामे सुरु आहेत, यापैकी 1 ते 50 बांधकाम मजूर संख्या असलेली 152 बांधकामे, 51 ते 100 बांधकाम मजूर असलेली 45 बांधकामे, 100 पेक्षा जास्त बांधकाम मजूर संख्या असलेली 40 बांधकामे आणि मजूर नसलेली परंतू बांधकाम सुरु होण्यापूर्वी खड्डा खोदून ठेवलेली एकूण 33 बांधकामे आहेत.

बांधकाम कार्यक्षेत्रात एकूण 270 बांधकामांमध्ये 265 ठिकाणी गप्पी मासे सोडले असून मागील तीन महिन्यांमध्ये एकुण 3560 बांधकाम मजूरांच्या घरांमध्ये पावडर फवारणी करण्यात आली आहे. 270 बांधकामांमध्ये 14390 कामगार काम करीत आहेत.

नियमित डासअळीनाशक फवारणी झाल्यावर सदर कामाची फेरतपासणी पर्यवेक्षक व अधिकारी यांचेमार्फत केले जात असून सदरचे काम प्रभावी होईल याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

तरी आरोग्य विभागाच्या कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Scroll to Top