तिकीट तपासनीस आणि मराठी प्रवाशामध्ये वाद
पश्चिम रेल्वेवरील मीरा रोड ते दादर असा वातानुकूलित लोकलमधून प्रवास करताना, तिकीट तपासनीसाने हिंदीतून तिकीटाची विचारणा केली. यावेळी प्रवाशाने आपले पास दाखवून, मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह धरला.
ते पाहून इतर तिकीट तपासनीसांनी एकत्र येऊन प्रवाशाला जाब विचारला. तसेच प्रवाशाला अंधेरी रेल्वे स्थानकात उतरवून रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात तब्बल दोन तास डांबून ठेवले. या प्रकरणी पश्चिम रेल्वेने जाहीर माफी मागावी, संबंधित तिकीट तपासनीसांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा बुधवारी रेल्वेविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे.
-शनिवारी दुपारी २.०६ वाजताची विरार – चर्चगेट वातानुकूलित लोकल मीरा रोड येथे दुपारी २.३० वाजता आली असता, या लोकलमध्ये प्रवासी तुकाराम मेंगडे चढले. त्यांना दादर येथे उतरायचे होते. यावेळी धावत्या लोकलमध्ये तिकीट तपासणी सुरू होती. एका तिकीट तपासनीसाने मेंगडे यांच्याकडे हिंदीत तिकीटाची विचारणा केली. त्यावर मेंगडे यांनी ‘महाराष्ट्रात काम करता, मराठीत संवाद साधा’, असे म्हटले. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. यावेळी एका तिकीट तपासनीसाने मराठी भाषेचा आग्रह धरल्याबद्दल त्या प्रवाशाला सुनावले. त्या तिकीट तपासनीसाने मराठी बाराखडी म्हणून दाखवली. तसेच व्हॉट्सअप मराठीतून वापरता का ? असा प्रवाशाला जाब विचारला. यादरम्यान प्रवासी आणि तिकीट तपासनीस यांनी एकमेकांचे मोबाइलवर चित्रिकरण केले.
या प्रकरणी मराठी एकीकरण समितीने आरपीएफ, रेल्वे पोलिसांना लेखी निवेदन देऊन, संबंधित तिकीट तपासनीस यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली.
मराठी भाषेत संवाद साधण्याचा आग्रह केल्यामुळे प्रवाशाला अंधेरी येथील आरपीएफ कार्यालयात दोन तासांहून अधिक काळ बेकायदेशीरपणे डांबून ठेवले. मराठीत संवाद साधण्यास सांगणे हे कोणत्याही प्रकारे सरकारी कामात अडथळा ठरत नसल्याचा दावा करून, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता प्रवाशाला ताब्यात ठेवणे हे नागरिकांच्या भाषिक हक्कांचे उल्लंघन असल्याचे समितीने म्हटले आहे. निवेदनात रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलामार्फत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.


