कृषी महाविद्यालय सरळगाव, ता. मुरबाड (जि. ठाणे) येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत भदाणे गावाला भेट देत शेतक-यांसाठी मार्गदर्शनपर उपक्रम राबविला. या उपक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पद्धती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना कृषी विकासासाठी उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यांना एकात्मिक शेती पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर करत पशुपालन, मत्स्य पालन, कुक्कुटपालन, परसबाग विकास, विविध प्रकारची खते व बियाणे, तसेच आधुनिक सिंचन पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करून त्यांना उत्पादनवाढीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी गावात वृक्षारोपण केले. तसेच गावातील लहान मुलांना सहभागी करून वृक्षदिंडी काढण्यात आली. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होऊन ग्रामस्थांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भदाणे येथील ग्रामस्थांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सकारात्मक सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमात कृषी उत्कर्ष गटातील ऋषिकेश राऊत, तेजस खताळ, हर्षल डोंगरे, सोहिल गायकवाड, ओम उबाळे, सिद्धांत वाघमारे, प्रज्वल दांडेकर, शुभम बाचकर, आयुष वसावे आणि सौरभ लेंगरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या संपूर्ण उपक्रमासाठी गटप्रमुख प्रा. एन. के. राऊत यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरला.


