ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात पावसाने पुन्हा एकदा समाधानकारक हजेरी लावली आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात अत्यंत संथ गतीने वाढ होत होती. मात्र, आता पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने रविवारी १९ जुलै रोजी धरणातील पाणीसाठ्याने ५४ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. असे असले तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा अजूनही तब्बल २४ टक्क्यांनी मागे असल्याने प्रशासनासह नागरिकांचे लक्ष पावसाच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.
यंदाच्या पावसाळ्यावर नजर टाकल्यास पावसाचा मोठा लपंडाव पाहायला मिळत आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली होती. ८ जुलै रोजी २४७.८० मिमी आणि ९ जुलै रोजी ५७.२० मिमी पाऊस पडल्याने धरणाचा साठा वेगाने ४८.२७टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर १० आणि ११ जुलैला अनुक्रमे अवघा १.४० मिमी आणि १.२० मिमी पाऊस झाल्याने साठा वाढीला मोठा ब्रेक लागला. सलग सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर १६ जुलै रोजी धरणाने कसेबसे ५० टक्क्यांचे लक्ष्य गाठले होते.
आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून आजच्या, १९ जुलै रोजच्या ताज्या आकडेवारीनुसार धरण क्षेत्रात ३६.०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा १८४.७८ दशलक्ष घनमीटर वर पोहोचला असून, पाण्याची टक्केवारी ५४.२३ टक्के इतकी झाली आहे. धरणाची पाणीपातळी आता ६६.०० मीटरवर पोहोचली आहे. धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे. यंदाच्या हंगामातील एकूण पावसाने बाराशेचा टप्पा ओलांडला असून तो आता १२०१.०० मिलीमीटर इतका झाला आहे.
यंदा पावसाने जून महिन्यात दिलेली ओढ आणि जुलैमध्येही मध्येच घेतलेली विश्रांती यामुळे ही मोठी तूट निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरण जवळपास २४ टक्क्यांनी आणि ४४८ मिमी पावसाने मागे आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे सावट कायमचे दूर करण्यासाठी आणि धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पाणलोट क्षेत्रात आगामी काळात मुसळधार आणि सलग पावसाची आवश्यकता आहे.


