पंढरपूर क्षेत्र स्वच्छतेसाठी नवी मुंबई महापालिकेचे विशेष स्वच्छता पथक रवाना

आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे लाखो -भाविक दाखल होत असल्याने परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष स्वच्छता पथक पंढरपूर येथे कार्यरत राहण्यासाठी रवाना झाले. महापौर सुजाता पाटील यांनी या स्वच्छता पथकास उत्तम कामासाठी शुभेच्छा दिल्या आणि हे पथक पंढरपूरकडे रवाना झाले.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली या स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष पंढरपूरमध्ये स्वच्छता निरीक्षक लवेश पाटील व नवनाथ ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता कामे करण्यात येणार आहेत. या पथकात २ स्वच्छता निरीक्षक, ३० स्वच्छता दूत तसेच मलनि:स्सारण विभागाची दोन सक्शन-अँड-जेटिंग (Suction & Jetting) सक्षम युनिट्स कार्यरत असणार आहेत. दिनांक २१ व २२ जुलै रोजी २ दिवस ही विशेष स्वच्छता मोहीम पंढरपूर क्षेत्रात राबविण्यात येणार असून मंदिर परिसर, प्रमुख मार्ग, सार्वजनिक ठिकाणे, स्वच्छतागृहे तसेच मलनि:स्सारण व्यवस्थेची स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेचे हे विशेष स्वच्छता पथक पंढरपूर शहर स्वच्छ, सुरक्षित व रोगमुक्त ठेवण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणार असून, भाविकांना स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असणार आहे.

Scroll to Top