भिवंडीत उड्डाणपुलावर भरधाव कारची तीन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, दोन गंभीर

भिवंडी शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर बुधवारी नियंत्रण सुटलेल्या भरधाव कारने दुचाकींना धडक दिल्याच्या भीषण अपघातात एकाच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की कारची ठोकर बसल्यानंतर एक जण थेट पुलावरून खालील रस्त्यावर फेकला गेल्याने मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीच्या दिशेने येणारी कार उड्डाणपुलावर भरधाव येताना ओव्हरटेक करण्याच्या नादात कारवरील नियंत्रण सुटल्याने कार चालकाने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यामध्ये एका दुचाकीवरील अज्ञात चालक थेट उड्डाण पुलावरून खाली रस्त्यावर पडला. तर दोन दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत. शाहरुख खान (३२) आणि आलम शाह (४७) या दोघा जखमींना स्थानिकांनी तातडीने भिवंडीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातातील कारचालक हा सुद्धा किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि शांतीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातामुळे उड्डाण पुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून शांतीनगर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत.

Scroll to Top