महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शैक्षणिक साहित्य व पत्रकारांना रेनकोटचे वाटप

भिवंडी – महाराष्ट्र राज्य मराठी
पत्रकार संघ, मुंबई शाखा ठाणे जिल्हा यांच्या वतीने भिवंडी तालुक्यातील अतिदुर्गम पाच्छापूर केंद्रातील नेवाडे, केल्हे, उंबरखांड आणि बरफपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळांतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नेवाडे समाजहॉल येथे उत्साहात पार पडला.

यावेळी सुमारे १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून देण्यात आला. तसेच पावसाळ्यात अहोरात्र वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना रेनकोटचे वाटप करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे होते.

ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे, सामाजिक कार्यकर्ते साजिद खोत आणि दत्ता शेठ ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी पूरपरिस्थितीत नागरिकांना सुखरूप बाहेर काढून उल्लेखनीय कामगिरी करणारे पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी, उत्कृष्ट क्रिकेटपटू अद्वेत जाधव तसेच एव्हरेस्ट शिखर सर करणारे मिहिर जाधव यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात विश्वासराव आरोटे म्हणाले,, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हा केवळ एक उपक्रम नसून समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा भाग आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती होऊ शकते. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील गरज ओळखून त्यासाठी पुढाकार घेणे हीदेखील पत्रकारांची जबाबदारी आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असून सत्याला वाचा फोडण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत जनहितासाठी कार्य करणारा संवेदनशील चेहरा आहे.

मुसळधार पावसातही जनतेपर्यंत अचूक व तात्काळ बातम्या पोहोचविण्यासाठी पत्रकारांना प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे लागते.

Scroll to Top