अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांच्याशी चर्चा, लवकरच उपाययोजनांचे आश्वासन
शीळ फाटा आणि कल्याण फाटा सर्कल परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दक्ष नागरिक संघटना आणि भूमिपुत्र धर्माभिमानी संघटना यांच्या पुढाकाराने ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त अशोक दुधे आणि मुंब्रा वाहतूक विभागाचे अधिकारी अतुल अहिरे यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीत स्थानिक नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांच्यासह भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे तालुका प्रमुख बाबुराव मुंडे, साहिल पाटील, वैशाली भोसले, रवींद्र पाटील, प्रवीण पावशे, भगवान फौजदार, करण खारपाटील, गिरीश पाटील, सुनील आलिमकर, अॅड. जितेश पाटील, शरद पाटील तसेच पत्रकार विनोद वास्कर, रमेश राऊत आणि मंगल खारपाटील उपस्थित होते.
बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी आणि नागरिक प्रतिनिधींनी शीळ फाटा-कल्याण फाटा परिसरातील वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची सविस्तर माहिती प्रशासनास दिली. सकाळ -संध्याकाळ होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि वेळेचा होणारा अपव्यय याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
यावर अप्पर पोलीस आयुक्त अशोक दुधे आणि वाहतूक अधिकारी अतुल अहिरे यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत लवकरच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, दक्ष नागरिक संघटनेने यापूर्वीही मुंब्रा वाहतूक व्यवस्थेतील त्रुटीं विरोधात सातत्याने पाठपुरावा करून ४० वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या घडवून आणल्या होत्या. त्यामुळे शीळ फाटा – कल्याण फाटा वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबाबतही संघटनेच्या या पुढाकाराकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


