विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छता दिंडी सोहळ्यात स्वच्छता व पावसाळी पाण्याच्या संग्रहण संदेशाचा जागर

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ हे अभियान देशभरात राबविले जात असून अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. असाच स्वच्छतेमधून आरोग्य जपणुकीचा संदेश प्रसारित करणारा ‘स्वच्छता दिंडी’ हा अभिनव उपक्रम करावे येथील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयाच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात ६५० हून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक पारंपारिक वेशात सहभागी झाल्याने हा दिंडी सोहळा अत्यंत लक्षणीय झाला.

याप्रसंगी शुभेच्छा देताना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेच्या दिंडी उपक्रमात शाळेची माजी विद्यार्थिनी आणि नवी मुंबईची प्रथम नागरिक म्हणून सहभागी होता आले याचे वेगळेच समाधान असल्याचे सांगितले. आपल्या महाराष्ट्राला भक्तीची मोठी परंपरा असून वर्षोनुवर्षे निघणाऱ्या आषाढी वारीतून एकात्मता आणि बंधुभावाचे दर्शन घडते.

हीच भावना जपत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता दिंडीतून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संरक्षण – संवर्धन, पावसाळी पाण्याचे संग्रहणाव्दारे नियोजन असे विविध संदेश प्रसारित होत असल्याबद्दल महापौरांनी आनंद व्यक्त केला. नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने करावेगाव येथी ज्ञानदीप शाळेच्या माध्यमातून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये सुरू असलेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत आयोजित स्वच्छता दिंडी उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी पालखी पूजन झाल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नगरसेविका संतोषी म्हात्रे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त प्रशांत नेरकर, मुख्य स्वच्छता अधिकारी राजुसिंह चव्हाण आणि नरेश अंधेर तसेच ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष रविंद्र नाईक, सचिव अरविंद नाईक, प्रसाद तांडेल, परशुराम पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, मुख्याध्यापक बंकट तांडेल, रत्नाकर तांडेल, सुरेश चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top