आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. येथे आयोजित महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात आयोजित महाआरोग्य शिबिरात आज मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अजित गोपछडे, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, संजय भेंडे, मोहन मते, राजीव पोतदार, महापौर नीता ठाकरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
समाजातील शेवटच्या घटकाला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या हाच या शिबिराचा उद्देश असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वांना आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य शासनाने घेतले. रुग्णालयांची संख्या वाढवली. राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत यापूर्वी जे गंभीर आजार नव्हते, ते समाविष्ट केले. गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातर्फे ५७ हजार रुग्णांना ४५२ कोटी रुपये उपचारांसाठी उपलब्ध करून दिले. सर्व धर्मादाय रुग्णालयातील खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव असल्या पाहिजे, यासाठी डिजिटल पद्धती निर्माण केली. जवळपास १० आजार असे आहेत की जे योजनेच्या ५ लाख रुपयांच्या मर्यादेत बसू शकत नाही, त्यामुळे त्यासाठी ९ लाखांपर्यंत, तर काही आजारांच्या बाबतीत ३५ लाख रुपयांपर्यंत मदत करण्याचे शासनाचे धोरण असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
ऐकू न आल्यामुळे बोलता नयेणाऱ्या मुलांची समस्या लक्षात घेता लहान मुलांसाठी कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया निःशुल्क सुरु केल्या. त्यामुळे ही मुले ऐकू शकतील व बोलूही शकतील. पुढच्या पिढीत कोणीही मूक-बधिर असणार नाही, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. दिव्यांग बांधवांना येत्या ९ ऑगस्ट रोजी कृत्रिम पाय, हातांचे वितरण केले जाणार आहे. सेवा हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे गरिबातल्या गरीब माणसाला मदत करून समाज निरोगी होण्याच्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


