बोरीवलीत एसआयआर जनजागृती अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मतदार यादी विशेष पुनरीक्षणासाठी फॉर्म भरण्याचे आवाहन

भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत भिवंडी तालुक्यातील बोरीवली ग्रामपंचायत हद्दीत जनजागृती अभियानाला वेग आला आहे. मतदार यादीतील माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने आवश्यक फॉर्म भरून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या मोहिमेंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले फॉर्म वितरित करीत असून, त्यामध्ये आवश्यक माहिती भरून घेतली जात आहे. फॉर्मवर पासपोर्ट आकाराचा छायाचित्र चिकटविणे तसेच मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा देणे बंधनकारक असल्याची माहितीही नागरिकांना देण्यात येत आहे. बोरीवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध प्रभागांमध्ये सामाजिक कार्यकर्ते अॅड. जियाद गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयआर जनजागृती व फॉर्म भरणे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बोरीवली गावासाठी चार बीएलओंची नियुक्ती करण्यात आली असून, प्रभाग क्रमांक १७८ साठी शाहीन सिद्दीकी, प्रभाग क्रमांक १७९ साठी फिरोज खान, प्रभाग क्रमांक १८० साठी अंजुम बानो अन्सारी आणि प्रभाग क्रमांक १८१ साठी सईदा शेख यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मोहिमेचे पर्यवेक्षक म्हणून प्रकाश सोनावणे कार्यरत आहेत. सध्या गावातील विविध ठिकाणी एसआयआर फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असून, नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बोरीवली ग्रामपंचायतीचे अधिकारी गणेश जाधव, सरपंच अन्वर पिंजारी तसेच सामाजिक कार्यकर्ते अॅड. जियाद गुजर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

Scroll to Top