(वार्ताहर) भिवंडीचा राजा म्हणून गौरविल्या जाणाऱ्या व मागील दोन वर्षात राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट गणेशोस्तव स्पर्धेत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रथम पुरस्कार मिळविलेल्या धामणकर नाका मित्र मंडळाच्या ३८ व्या गणेशोत्सवाचा शुभारंभ पाद्य पूजन व सजावट मंदिराचा भूमिपूजनाने मोठ्या उत्साहात संस्थापक अध्यक्ष संतोष शेट्टी व शशिलता शेट्टी यांच्या शुभहस्ते पूजन करून करण्यात आला. याप्रसंगी धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्थेचे प्रमुख पदाधिकारी दिलीप पोद्दार, हसमुख पटेल, संजय शहा, राजेश शेट्टी, तारुभाई जाधव, संतोष जंपाल, राजेश पुजारी, राकेश पटवारी, ईश्वर पामू, संजय भोईर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यंदा धामणकर नाका मित्र मंडळाच्या वतीने यंदा वाराणसी येथील सर्वेद महामंदिर धाम याची ११० फूट उंचीची भव्य पर्यावरणपूरक प्रतिकृती उभारली जाणार असल्याची माहिती संस्थापक संतोष शेट्टी यांनी दिली आहे. प्रत्येक वर्षी भव्यदिव्य देखावे उभे करण्याची परंपरा यंदा ही कायम असल्याचे सांगत शहरातील राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्म समभाव जोपासण्याचे कार्य या निमित्त भिवंडी शहरात मंडळाच्या माध्यमातून केले जात असल्याचे संतोष शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. या वेळी गणरायाच्या चांदीच्या पादुकांची पाद्यपूजा करण्यात आली. सजावट देखाव्याच्या कामाचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला. तर सजावट केल्या जाणाऱ्या सर्वेद महामंदिर धाम बॅनरचे अनावरण इस्कॉन मंदिराचे श्री सुदाम प्रभू यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


