विरार-अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांना मोबदला देताना राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी खोडा घालीत असल्याचा आरोप खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केला आहे. ते विरार अलिबाग कॉरिडोर प्रकल्पात भिवंडीतील १४ गावांमधील बाधित शेतकऱ्यांच्या भूसंपादित जमिनींना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी मानकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या पदयात्रा मोर्चा प्रसंगी बोलत होते.
या प्रकल्पा मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला दिला जात असून याच परिसरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन बाधित शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या मोबदल्या पेक्षा कमी आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतेत असून त्यांचे नुकसान होत असल्याने हे त्यांच्यावर अन्यायकारक ठरत आहे. या मागणी साठी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली मानकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा मोर्चाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या आंदोलनात १४ गावातील बाधीत शेतकऱ्यांसह महिला, नागरिक व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी मानकोली नाका येथून निघालेला हा मोर्चा हायवे दिवा खरेगाव मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. पावसाने हजेरी लावली असता भर पावसात आंदोलक महिला व पुरुषांनी घोषणा देत या आंदोलनात सहभाग नोंदवला. ठाणे किल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभे दरम्यान जेष्ठ नेते आर. सी. पाटील, उद्धव सेनेचे उपनेते विश्वास थळे, खासदार सुरेश म्हात्रे यांनी सभेला संबोधित केले.


