भिवंडीत वाहतूक विभागाचा नियोजन शून्य कारभार

अंजुरफाटा चौकात एका मिनिटाच्या अंतराला तब्बल पाऊण तासाचा खोळंबा

भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून ही वाहतूक कोंडी सोडविण्यात भिवंडी वाहतूक पोलीस प्रशासनाला पुरते अपयश आले आहे. शहरातील अंजुर फाटा चौकातील एक मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांचा तब्बल पाऊण तासांचा खोळंबा होत असल्याने वाहन चालकांसह प्रवाशांमध्ये वाहतूक पोलीस विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भिवंडीत राहनाळ, पूर्णा, दापोडा, मानकोली, कोपर, वळगाव परिसरात गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात असल्याने वसई चिंचोटी वरून अवजड वाहने अंजुर फाटा मार्गे काल्हेर पूर्णा व मानकोली येथे जात असतात. यावेळी वाहतूक विभागाकडून अंजुर फाटा चौकात ही अवजड वाहने अडवून धरली जात असल्याने एका मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना तब्बल पाऊण तास एकाच ठिकाणी थांबण्याची वेळ येत आहे. विशेष म्हणजे अंजुरफाटा चौकातील अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना केवळ एक मिनिट वेळ लागतो. परंतु आज वाहतूक पोलीस प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अंजुरफाटा येथे वाहने अडवून ठेवल्याने अंजुर फाट्यावरून धामणकर नाका, राहनाळ, मानकोली, ताडाळी येथे जाण्यासाठी वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Scroll to Top