आधुनिक शेतीकडे शहापूरची वाटचाल; अर्जुनली, सरलांबे येथे यांत्रिक भातलागवडीचे प्रात्यक्षिक

ठाणे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा संदेश

शहापूर – शहापूर तालुक्यातील अर्जुनली व सरलांबे येथे कृषी विभाग व आत्मा (ATMA) यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक यांत्रिक भातलागवडीचे प्रात्यक्षिक उत्साहात पार पडले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), ठाणे रामेश्वर पाचे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रात्यक्षिकातून बदलत्या शेती पद्धती, मजुरांची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जितेश खांडगे, मंडळ कृषी अधिकारी नितेश आंबेकर, सहाय्यक कृषी अधिकारी योगेश डेरे तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रात्यक्षिक दरम्यान भात लागवड यंत्राच्या साहाय्याने कमी वेळात, कमी मनुष्यबळात आणि शास्त्रोक्त पद्धतीने रोपांची लागवड कशी करता येते, याचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. यंत्राद्वारे एकसमान अंतरावर व योग्य खोलीवर लागवड होत असल्याने मजुरी, वेळ आणि उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनक्षमतेत वाढ होत असल्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केल्यास शेती अधिक किफायतशीर व उत्पादनक्षम बनते, असे सांगितले. तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतीचे यांत्रिकीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रात्यक्षिकावेळी अधिका-यांनी भातलागवडीतील तांत्रिक बाबी, योग्य अंतरावरील रोपलागवड, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत समाधान व्यक्त केले.
19:474376
73.380674
49.96±10.1 m
3.0 m
29-2026 11:48
नने भात लागवड

Scroll to Top