स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव डावखरे फाउंडेशनच्या वतीने गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेला ‘अविस्मरणीय अजित दादा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात झाला.
संगीत, साहित्य, कला, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातून स्व. अजित पवार यांच्या समाजाभिमुख कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना सुरेल मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. अजित पवार आणि स्व. वसंत डावखरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांनी ‘माऊली माऊली’ तसेच ‘ओल्ड इज गोल्ड’ मेडली सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय ‘पल पल दिल के पास’, ‘मुसाफिर हूँ यारों’, ‘आनेवाला पल’, ‘नीले नीले अंबर’ यांसारख्या अजरामर गीतांनी वातावरण भारावून गेले. बालकलाकारांच्या सादरीकरणालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिद्द शाळेच्या विशेष मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याला ठाणेकरांनी दाद दिली. प्रत्येक गीताची सांगड स्व. अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाशी घालण्यात आल्याने कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक तथा वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष आणि युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत स्व. अजित पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजकार्यात अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळोलकर, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, माजी आमदार सुभाष भोईर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेवक मनोज शिंदे, राजन किणी, सुहास देसाई, नगरसेविका वहिदा खान, पूनम माळी, सभागृह नेते हणमंत जगदाळे तसेच स्व. अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिगळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्व. अजित पवार यांना आदरांजली वाहत प्रबोध डावखरे यांच्या सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजकीय मतभेद असूनही सामान्य नागरिकांची कामे तातडीने पूर्ण करण्याची स्व. अजित पवार यांची कार्यपद्धती अधोरेखित केली. आमदार संजय केळकर यांनी विरोधी पक्षात असतानाही लोकहिताचे निर्णय घेण्याची त्यांची तयारी आणि निर्णयक्षमता याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, “पूर्वी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करायचो; आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम सोबत आहेत. सर्व समाजाला एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची शैली आणि लोकाभिमुख नेतृत्व आजही प्रेरणादायी आहे.” सुरेल संगीत, भावनिक आठवणी आणि समाजसेवेचा संदेश यांचा सुंदर संगम घडविणारा ‘अविस्मरणीय अजित दादा’ हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात कायमची आठवण निर्माण करून गेला.


