रिंग मेट्रोबाबत सविस्तर माहितीसाठी नगरसेवकांची विशेष सभा घ्यावी

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांची

ठाणे शहरातील प्रस्तावित रिंग मेट्रो संदर्भात नगरसेवक-नगरसेविकांना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्याबरोबरच शंकांचे निरसन करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभा आयोजित करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

केंद्र सरकारच्या सहकार्याने ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपये खर्चुन रिंग मेट्रो उभारण्यात येणार आहे. या मेट्रोच्या मार्गाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. इतकेच नव्हे तर सर्वपक्षीय नगरसेवक-नगरसेविकांनाही रिंग मेट्रोच्या मार्गाबाबत माहिती नाही. नागरिकांच्या शंकांचे लोकप्रतिनिधीही निरसन करू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती देण्यासाठी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभा आयोजित करावी. त्यात रिंग मेट्रो प्रकल्पाचा अंतिम आराखडा, प्रस्तावित स्थानके आणि मार्ग आदींबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या बैठकीतील सूचनांची सविस्तर माहिती द्यावी. या सभेला महामेट्रो व महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवावे, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.

Scroll to Top