टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी भिवंडी पोलिसांनी अटक केलेल्या सर्व १५ आरोपींना भिवंडी न्यायालयाने सोमवारी १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठोठावली आहे. २८ जून रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या टी ई टी परीक्षेचा पेपर २६ जून रोजी विक्री साठी आलेल्या तिघा जणांना पकडून टी ई टी परीक्षा पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस आणले होते. त्यानंतर आता पर्यंत धीरज बलराज सिंग, राजीव शाव, आकाश कुमार, सरोज कुमार, सुमन कुमारी, विजेंदर गुप्ता, सोनू कुमार सिंह, मिथुनकुमार सिंह, कपिल कृष्णा दहिया, संजयकुमार, सुरेशचंद्र शर्मा, बाबुलाल नारायण सिंह कुशवाह, नरेशकुमार पुरनचंद माहौर उर्फ निकी, पवन यादव, हरिओम सिंग पोनी, बिजेंद्र गुप्ता, इंद्रजीत सिंग ऊर्फ पिकू, सोनू कुमार दिवाकर अशा १५ जणांना अटक केली होती. या सर्वांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. परंतु शेवटच्या टप्प्यात बिजेंद्र गुप्ता, इंद्रजीत सिंग ऊर्फ पिकू, सोनू कुमार दिवाकर हे मुख्य सूत्रधार अटक झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात पुन्हा १२ आरोपींची समोरासमोर तपास करण्यासाठी पोलिस कोठडीत देण्याची मागणी केली. त्यानंतर सर्व आरोपींची एकत्र चौकशी केल्यानंतर सोमवारी (३) रोजी सर्व १५ आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना १७ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली असल्याची माहिती आरोपींचे वकील अँड. शैलेश गायकवाड यांनी दिली आहे.


