भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांची पोलिस आयुक्तांकडे तक्रार
ठाणे रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस पूलाखालील पहिली मार्गिका सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुली केल्यानंतर, रेल्वे स्टेशनमध्ये उतरल्या उत्तरल्या प्रवाशांना रिक्षाचालकांचा वेढा पडत आहे. जादा भाड्याच्या शोधात रिक्षाचालकांनी मार्गिकेतच रिक्षा उभ्या केल्यामुळे प्रवाशांना चालण्यासाठीही जागा राहिलेली नाही. दररोज सकाळी व सायंकाळी
जादा भाड्यासाठी रिक्षाचालकांची मार्गिकेत गर्दी होत असल्यामुळे रिक्षाच्या रांगेतील प्रवाशांना तास ते दीड तासांची प्रतिक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीकडे भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी पोलिस आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर सॅटीस पूल उभारल्यानंतर पहिली मार्गिका मोकळी ठेवण्यात आली होती. त्यात अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला होता. तर दुसऱ्या मार्गिकेत रिक्षा स्टॅण्ड व टॅक्सी स्टॅण्ड ठेवण्यात आला होता. शेवटच्या मार्गिकेतून रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या खासगी वाहनांना पुन्हा बाहेर पडण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी पहिली मार्गिका सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुली केली. परिणामी टॅक्सी व रिक्षाचालकांकडून बिनधास्तपणे या मार्गिकेत रिक्षा व टॅक्सी उभ्या केल्या जात आहेत. परंतु, या रिक्षाचालकांकडून सोयिस्कर व मोठ्या रक्कमेचे भाडे मिळविण्यासाठी प्रवाशांना वेठीला धरले जात आहे.


