सुप्रसिद्ध सिनेकलावंत संदीप पाठक यांनी केले साठेपाडा आदिवासी वस्तीचे कौतुक

सुप्रसिद्ध सिनेकलावंत तथा मुख्यमंत्री पंचायत राज अभियानचे प्रचारक संदीप पाठक यांनी आबिटघर ग्रामपंचायती मधील साठेपाडा येथे भेट देऊन आदिवासी संस्कृती, समृद्ध परंपरा आणि ग्रामस्थांच्या आत्मीय आदरातिथ्याचे तोंडभरून कौतुक केले.

वाडा तालुक्यातील आबिटघर ग्रामपंचायत येथे व त्यानंतर येथील आदिवासी वस्तीतील साठेपाडा येथे उपस्थिती दर्शविली होती. यावेळी गटविकास अधिकारी वैभव शिंदे, सरपंच साक्षी साठे, उपसरपंच धनश्री पाटील, ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील यांनी आबिटघरकरांच्या वतीने संदीप पाठक यांचे गौरी नाचाच्या फेऱ्यानी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

या भेटीत पाठक यांनी येथील ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला तसेच येथील पारंपरिक वेशभूषा, लोककला, निसर्गाशी एकरूप झालेली आदिवासी जीवनशैली आणि सांस्कृतिक वारसा अनुभवत त्याचे मनापासून कौतुक केले. तर ‘आदिवासी संस्कृती’ ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा अमूल्य ठेवा आहे. या परंपरांचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी गौरवोद्वार काढले.
दरम्यान, आबिटघर ग्रामपंचायत व साठेपाड्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला राज्यस्तरावर नवी ओळख मिळाल्याची भावना अबिटघरच्या सरपंच साक्षी साठे यांनी व्यक्त केली.

Scroll to Top