भिवंडीत इस्कॉन मंदिर तर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रेला भाविकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भिवंडीतील इस्कॉन मंदिरात २३ ते २८ ऑगस्ट या कालावधीत श्री श्री राधा माधव झूलन यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सहा दिवसीय आध्यात्मिक महोत्सवात दररोज आकर्षक पुष्पसजावटीने सुशोभित झुल्यावर श्री श्री राधा माधव यांना विराजमान करून विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती इस्कॉन मंदिर व्यवस्थापनाने दिली आहे.
झूलन यात्रा हा वैष्णव संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव असून श्रावण महिन्यात वृंदावनातील श्री श्री राधा कृष्णांच्या दिव्य लीलांच्या स्मरणार्थ तो साजरा केला जातो. या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक भाविकाला स्वतःच्या हस्ते भगवान श्री श्री राधा माधवांना प्रेमपूर्वक झुला देण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे. भक्तिभावाने भगवानांना झुला अर्पण करणे हे अत्यंत शुभ आणि आध्यात्मिक दृष्ट्या मंगल मानले जाते. महोत्सवा दरम्यान दररोज हरिनाम संकीर्तन, भक्तिगीते, आध्यात्मिक प्रवचने, विशेष दर्शन तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादा ची व्यवस्था करण्यात आली आहे. या महोत्सवाची सांगता २८ ऑगस्ट रोजी श्री बलराम पूर्णिमा उत्सवाने होणार आहे. भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू श्री बलरामजींचा प्राकट्य दिन म्हणून हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी विशेष अभिषेक, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन श्री श्री राधा माधवांना स्वतःच्या हस्ते झुला अर्पण करावा असे आवाहन व्यवस्थपना तर्फे करण्यात आले आहे.


