नागरिकांच्या समस्यांसाठी ‘महापौर दिन’ तिसऱ्या उपक्रमात १२ तक्रारी प्राप्त

नागरिकांच्या विविध नागरी समस्या, तक्रारी व सूचनांचे तात्काळ आणि प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा तिसरा ‘महापौर दिन’ सोमवारी (१० ऑगस्ट) पार पडला. यावेळी नागरिकांकडून एकूण १२ तक्रारी व निवेदने प्राप्त झाली. महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात आयोजित या उपक्रमात नागरिकांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक सुविधा, अतिक्रमण, आरोग्य तसेच अन्य नागरी सेवांशी संबंधित समस्या मांडल्या. महापौर डिंपल मेहता यांनी नागरिकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

केवळ तक्रारींची नोंद न घेता त्यांचे वेळेत व प्रभावीपणे निराकरण होण्यासाठी संबंधित विभागांनी पाठपुरावा करावा, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या. नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविता याव्यात आणि त्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी, यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ‘महापौर दिन’ आयोजित केला जात आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त स्वप्नील सावंत, माहिती व जनसंपर्क अधिकारी राज घरत, सर्व प्रभागनिहाय सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

Scroll to Top