शहापूर भाजपच्या ओबीसी मोर्चाची धुरा सतीश सापळेंकडे

शहापूर – भारतीय जनता पक्षाच्या
शहापूर तालुका पूर्व मंडळ ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सतीश सापळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते सापळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे शहापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या नव्या जबाबदारीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमास भाजप नेते केशव उपाध्ये, भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सतीश सापळे यांनी यापूर्वी भाजप तालुका सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. तसेच भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण युवा सरचिटणीस म्हणून त्यांनी संघटनात्मक जबाबदारी सांभाळली आहे. पक्ष संघटनेतील अनुभव, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि ग्रामीण भागातील व्यापक जनसंपर्क यामुळे त्यांच्यावर ओबीसी मोर्चाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.

सापळे हे आल्याणी विविध सेवा सहकारी सेवा सोसायटीचे संचालक असून, शिवसह्याद्री सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात ते सक्रियपणे कार्यरत असून, ग्रामीण भागातील शेतकरी, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभमिळावा, यासाठी सापळे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ओबीसी मोर्चाच्या नव्या जबाबदारीतही समाजातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहापूर तालुक्यात ओबीसी समाजाची मोठी लोकसंख्या असल्याने ओबीसी सतीश सापळे यांच्या नेतृत्वामुळे शहापूर पूर्व मंडळातील ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा भाजपा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील जनसंपर्काचा अनुभव आणि पक्ष संघटनेतील कामाचा फायदा नव्या जबाबदारीत होईल, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

सतीश सापळे यांच्या नियुक्तीचे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि ओबीसी समाजातील विविध घटकांकडून स्वागत करण्यात आले असून, नव्या जबाबदारीसाठी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Scroll to Top