७ ते ५५ टन क्षमतेच्या इलेक्ट्रिक ट्रकच्या संपूर्ण श्रेणीचे अनावरण
‘आजचा दिवस केवळ नवीन इलेक्ट्रिक ट्रकच्या लॉन्चचा नाही, तर भारताच्या हरित आणि शाश्वत वाहतूक क्रांतीचा महत्वपूर्ण टप्पा आहे. बॅटरी व इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाला हरित वाहतुकीची दिशा दाखवत आहे,’ असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
टाटा मोटर्सने ७ ते ५५ टन क्षमतेच्या भारतातील पहिल्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे सादरीकरण केले. या ऐतिहासिक प्रसंगी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी अनुकूल धोरणात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्याच्या EV धोरणामुळे वाहन उत्पादक, उद्योग आणि चाहतूक क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध होत आहेत. ‘पुण्यात भारतीय अभियंत्यांनी डिझाइन आणि विकसित केलेले है इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय कौशल्य, तंत्रज्ञान आणि उत्पादनक्षमता यांची ताकद या वाहनांमधून दिसून येते’ असे सरनाईक यांनी सांगितले.
या इलेक्ट्रिक ट्रकची एका चार्जमध्ये सुमारे ३५० किलोमीटरपर्यंतची रेंज, फास्ट चार्जिंगची सुविधा आणि कमी ऑपरेटिंग खर्च ही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. कमी वेळेत चार्जिंग पूर्ण झाल्याने टूक अधिक वेळ रस्त्यावर धावू शकतो आणि वाहतूकदारांची उत्पादकता वाढू शकते. ‘हा ट्रक केवळ पर्यावरणपूरक नाही, तर वाहतूकदार आणि चालकांसाठी अधिक फायदेशीर, विश्वासार्ह आणि किफायतशीर पर्याय ठरणार आहे. भविष्यातील व्यावसायिक वाहतुकीची दिशा आता स्पष्ट झाली आहे,’ असे सरनाईक म्हणाले.


