कसारा येथे ‘बिरसा मुंडा करे पुकार.. उलगुलान’ चा जयघोष

९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिन कसारा येथे जल्लोषात साजरा करण्यात आला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार ९ ऑगस्ट १९९४ पासून आदिवासी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. तमाम आदिवासींच्या आत्मसन्मानाचा, अस्तित्वाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने या वर्षीच्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष विलास बेंडकुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसाऱ्यात दिवसभर मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील अग्रवाल हायस्कूलच्या भव्य प्रांगणावर आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याच प्रमाणे बिरसा मुंडा, राघोजी भांगरे आदी आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे यथायोग्य पूजन करण्यात आल्यानंतर या नियोजित मनोरंजनात्मक कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कसारा पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांनी भूषविले तर सूत्रसंचालनाची जबाबाबदरी पत्रकार नितीन नाडेकर यांनी लीलया पार पाडली.

यावेळी अध्यक्षांसह सरपंच, उपसरपंच अनुक्रमे प्रकाश वीर, शरद वेखंडे आणि इतरही काही वक्त्यांनी समस्त आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शब्दरूपी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी शालेय विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने अपेक्षित सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. या आनंददायी सोहळ्यात गावातील विविध राजकीय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. या वेळी काही आदिवासी बांधवांनी पारंपारिक वेशभूषा करून बघ्यांचे लक्ष तर वेधलेच शिवाय आपल्या आदिम संस्कृतीचे देखील दर्शन घडविले. दुपारी अग्रवाल हायस्कुल ते मुख्य बाजारपेठमार्गे पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या जल्लोशपूर्ण मिरवणूक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे स्मारकास अभिवादन करून कसारा पश्चिमेकडील पंचशील नगर विभागातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीची सांगता झाली. दरम्यान समितीचे सल्लागार व पदाधिकारी जयराम बेंडकुळे, सोमनाथ डगळे, महेश गिळंदे, नारायण पेढेकर, मनोहर झोले, बाळा पादिर, आकाश वाघ, संतोष वारघडे, प्रशांत आवारी आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मेहनत घेतली.

Scroll to Top