महापौर, उपमहापौरांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीतून राष्ट्रभक्तीच्या संदेशाचे प्रसारण

केंद्र व राज्य शासनाच्या ‘घरोघरी तिरंगा अर्थात हर तिरंगा’ मोहीमेअंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आज महापौर सुजाता पाटील व उपमहापौर दशरथ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली.

‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा देत कुकशेत येथील नवी मुंबई महापालिका इंग्रजी माध्यम शाळा क्र. १२१ मधील विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच शिक्षक आणि नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे नमुंमपा पूर्वप्राथमिक शाळा क्र. ९२ मधील चिमुकल्यांनीही बोबड्या बोलात भारतमातेचा जयजयकार केला. महापौर व उपमहापौर महोदयांनी या लहानग्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी ओलू, सुकू, घातकू हे ओला, सुका व घरगुती घातक कचऱ्याची प्रतिकचिन्ह असलेले ३ शुभंकर (मॅस्कॉट) तिरंगा रॅलीचे आकर्षण होते.

याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन व नरेश अंधेर आणि इतर अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग कार्यालयांमार्फत तसेच शाळाशाळांमध्ये तिरंगा रॅलींचे आयोजन करण्यात येत असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे ‘घरोघरी तिरंगा घरोघरी स्वच्छता घरोघरी आरोग्य’ असे अभियान विभागाविभागांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या सर्वच उपक्रमांना उत्साही जनसहभाग लाभत असून आजची नेरूळ विभागातील तिरंगा रॅलीही महापौर व उपमहापौर यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभक्तीचा गजर करीत जल्लोषात संपन्न झाली. —

Scroll to Top