शहापुरात भाजपची भव्य तिरंगा रॅली.

देशभक्तीच्या घोषणांनी शहर दुमदुमले

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहापूर शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात डौलाने फडकणारे तिरंगे, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम् ‘च्या घोषणांनी भारलेले वातावरण आणि देशभक्तीचा उत्साह यामुळे संपूर्ण शहापूर शहरात राष्ट्रप्रेमाचा माहोल निर्माण झाला.

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या निवासस्थानापासून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत रॅली पंचायत समितीच्या प्रांगणातील शिवतीर्थ येथे पोहोचली. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभागी झाले होते.

रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम् ‘सह देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तिरंगा हातात घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष आकर्षण ठरला. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनीही उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. तिरंग्याच्या सन्मानासाठी आयोजित या उपक्रमामुळे शहापूर शहरात उत्साहाचे आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते.

या रॅलीत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, युवा मोर्चा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जगन पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, भाजप नेते अशोक इरनक, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, ग्रामीणचे सरचिटणीस गणेश राऊत, विवेक नार्वेकर, मंडळ अध्यक्ष तुकाराम भाकरे, दीपक बोंबे, प्रकाश सांडे, राम जागरे, सुनील लकडे, शेखर अधिकारी, सतीश सापळे, अतुल भोईर, प्रशांत खर्डीकर, योगेश ठाकरे,भाजप महिला आघाडीच्या निशिगंधा बोंबे व्यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला विशेष रंगत आली. तिरंग्याच्या सन्मानार्थ दिलेल्या घोषणांनी आणि देशभक्तीच्या उत्साहाने शहापूर शहरात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Scroll to Top