भिवंडी – भिवंडी तालुक्यातील गोरसई गावचे भूमिपुत्र तथा सामाजिक बांधिलकी जपत गेल्या २० वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात निःस्वार्थपणे कार्य करणारे पत्रकार शरद काशिनाथ धुमाळ यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व पत्रकारिता कार्याची दखल घेत नालंदा एन.आय.आय. आर.सी. युनिव्हर्सिटी इंडिया यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
पुणे येथील पत्रकार भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या शरद धुमाळ यांनी पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता सामाजिक बांधिलकीचे माध्यम म्हणून काम केले आहे.
विविध दैनिकांमध्ये वार्ताहर म्हणून कार्यरत असताना त्यांनी भिवंडी तालुका तसेच ठाणे जिल्ह्यातील जनसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. त्यांच्या बातम्या, लेख आणि वृत्तांच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्यावर कार्यवाही होण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच बँका, पेट्रोल पंप, पतपेढ्या आणि विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी स्वच्छतागृह तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठीही त्यांनी आवाज उठवला. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या समस्यांनाही त्यांनी आपल्या पत्रकारितेतून प्राधान्य दिले.
गेल्या दोन दशकांपासून सामाजिक प्रश्नांना सातत्याने प्रसिद्धी देत जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत नालंदा एन.आय.आय.आर.सी. युनिव्हर्सिटी इंडिया यांनी शरद काशिनाथ धुमाळ यांना पत्रकारिता व मीडिया क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट प्रदान केली.
या सन्मानाबद्दल शरद धुमाळ यांचे विविध सामाजिक, पत्रकारिता व नागरिक क्षेत्रातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.


