ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या कारवाईला यश आले आहे. गुन्हे शाखा घटक-२, भिवंडीच्या पथकाने एका सराईत वाहन चोराला अटक करून त्याच्याकडून मोटारसायकल आणि १ ऑटो रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत वाहन चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिस हवालदार साबीर शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी अक्षय पिराजी पवार (वय २२) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर चोरीच्या वाहनांची माहिती समोर आली. त्यानुसार ४ मोटारसायकल आणि १ ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली.
निजामपुरा, शांतीनगर, हिललाईन आणि मानपाडा पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा या कारवाईत उलगडा झाला आहे. आरोपीने आणखी मोटारसायकली चोरल्या असण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने पुढील तपास गुन्हे शाखा घटक-२, भिवंडीकडून सुरू आहे. ही कारवाई ठाणे शहर पोलीस सहआयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध – १) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा घटक-२ भिवंडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, सपोनि – मिथुन भोईर, पोउनि रवींद्र पाटील, पोउनि – रामचंद्र जाधव, सपोउनि सुनील साळुंखे, पोहवा – साबीर शेख, पोहवा – राजेश गावडे, पोहवा – वामन भोईर, पोहवा – सुदेश घाग, पोहवा निलेश बोरसे, पोशि – नितीन नंदीवाले, पोशि- सर्फराज तडवी, पोशि – संजय चव्हाण यांनी ही कामगिरी केली. —


