ज्ञान विकास मंडळाच्या मेहता महाविद्यालयात मराठी भाषा आणि वाङ्गय मंडळाचा ‘वर्षारंग’ हा पावसावर आधारित कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात दिनांक १३ ऑगस्ट रोजी उत्साहात सादर झाला. या कार्यक्रमात पावसाच्या कविता, लेख, गाणी व नृत्य सादर करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली. कार्यक्रमात बा. सी. मर्देकर, आरती प्रभू, शांता शेळके, मंगेश पाडगावकर अशा अनेक मान्यवर साहित्यिकांच्या कविता विद्यार्थ्यांनी गाऊन, अभिवाचन करून उत्कृष्ठरित्या सादर केल्या. पावसाळा कसा अनुभवावा हे सांगणारा लेख सादर करण्यात आला. संत चोखामेळा यांचा अभंग विद्यार्थीनींनी नृत्यातून सादर करून प्रेक्षकांना विठ्ठलमय केलं. श्रावणात होणाऱ्या मंगळागौरीच्या पूजेच्या वेळी खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांची झलक विद्यार्थीनींनी दाखवून प्रेक्षकांच मन जिंकले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका दिपाली वलेकर मॅडम यांनी वाङ्गय मंडळाची भूमिका मांडून प्रेक्षकांचं स्वागत केलं. कार्यक्रम पाहण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.आर. देशपांडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात मराठी वाङ्गय मंडळ दरवर्षी दर्जेदार कार्यक्रम सादर करून मराठी भाषेची विद्यार्थ्यांमध्ये गोडी वाढवत असल्याबद्दल मराठी वाड्.मय मंडळाचे कौतुक केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका तृप्ती प्रदीप, कनिष्ठ व पदवी महाविद्यालयाचे शिक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याणी तंतरपाळे या विद्यार्थीनीने केले, तर निवेदन यश पवार व आर्या हांडे या विद्यार्थ्यांनी केले. मराठी वाड्.मय मंडळ प्रमुख मंगल कातकर यांनी कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेऊन उपस्थितांचे आभार मानले. बाहेर पाऊस कोसळत असताना सगळ्यांची मनं चिंब भिजवणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


