श्रावणी सोमवार निमित्त भाविकांमध्ये हिवताप / डेंग्यू आजाराबाबत जनजागृती

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य विभागामार्फत हिवताप / डेंग्यू यासारख्या आजाराचा प्रसार रोखण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शिवमंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या २० नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिवमंदिरांमध्ये हिवताप / डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या २० ठिकाणच्या शिबिरांमध्ये शिवमंदिरांमध्ये आलेल्या एकूण ८५६३ भाविकांनी भेट दिली असून यामध्ये १३७ रक्तनमुने घेण्यात आले आहेत.

सदर शिबिरांचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना अॅनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्ती स्थान तसेच डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवण्यात आल्या. तसेच घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने, जसे की पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करावेत, त्याचबरोबर पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस त्या स्वच्छ करून कोरड्या ठेवणे, पडलेले भंगार साहित्य व टायर्स नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट व ताडपत्री यामध्ये पाणी साचू देवू नये तसेच ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले व आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. डास प्रादुर्भावावर नियंत्रण मिळण्याकरिता नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये विशेष धूरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे., सदरची मोहीम ६ गटांमध्ये राबविण्यात येत असून या मोहिमेकरीता ४ ते ५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील धुरीकरण कर्मचारी एकत्रित येऊन संपूर्ण नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये एकाच दिवशी धुरीकरण करण्यास सुरूवात करण्यात आलेली C
आहे. यामध्ये आज १७ ऑगस्ट रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र – सीबीडी, वाशीगाव व दिघा या पहिल्या गटाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये रासायनिक धुरीकरण मोहिम राबविण्यात आली. अशाच प्रकारची मोहीम उद्या मंगळवार दि. १८/८/२०२६ रोजी दुसऱ्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र – से-४८, कुकशेत, पावणे, घणसोली येथे तसेच बुधवार दिनांक १२/८/२०२६ रोजी तिसऱ्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र करावे, नेरुळ-२, तुर्भे, नोसीलनाका, कातकरीपाडा आणि गुरुवार दिनांक २०/८/२०२६ रोजी चौथ्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र- शिवणे, सानपाडा, इलठणपाडा त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक २१/८/२०२६ रोजी पाचव्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-नेरुळ-१, जुहुगाव, महापे, चिंचपाडा व शनिवार दिनांक २२/८/२०२६ रोजी सहाव्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र – इंदिरानगर, खैरणे, राबाडा, ऐरोली येथे विशेष धुरीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

Scroll to Top