मालमत्ता करवाढीवर विचार करा, अन्यथा ठाणे महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार

शिवसेना उबाठाच्या शिष्टमंडळाचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा

शहरात होणारी दररोजची वाहतूक कोंडी, कचरा प्रश्न, पाणी, जागोजागी खड्डे यासारख्या मूलभूत सुविधांसाठी ठाणेकर आधीच मेटाकुटीला आला आहे. हा त्रास भोगत असताना सर्वसामान्य ठाणेकरांवर सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाने मालमत्ता करवाढीची कुन्हाड चालवली आहे. निवासी मालमत्तांवर १२ टक्के तर वाणिज्य मालमत्तांवर २० टक्के करवाढ केल्याने सामान्य ठाणेकरांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. ही करवाढ सामान्य ठाणेकरांवर आर्थिक बोजा टाकणारी असून करवाढीवर विचार करावा, अन्यथा ठाणेकर नागरिकांना घेऊन पालिका मुख्यालयावर मोर्चा काढू असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांना दिला.

पक्षाच्या शिष्टमंडळाने ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांना भेटून निवेदन दिले. महापालिकेच्या महासभेत मालमत्ता कराच्या दरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावावर सभागृहात अपेक्षित चर्चा होणे गरजेचे असताना बहुमताच्या जोरावर विषय मंजूर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणती करवाढ किंवा दरवाढ होणार नाही असा विश्वास पालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांना दिला होता, मात्र तसे झालेले दिसत नाही असा आरोप शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. दरम्यान आर्थिक अव्यवस्थेचे पाप ठाणेकरांवर का? या करवाढीमुळे आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, ठाणे महानगरपालिका नगरसेवक शहाजी खुस्पे, महिला जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर, शहर संघटिका प्रमिलाताई भांगे, विभाग संघटिका राजश्री सुर्वे, संगीता साळवी, अनुजा पिंजारी, राजेंद्र महाडिक, विभागप्रमुख राजीव शिरोडकर, रमेश शिर्के, राजू मोरे, स्वप्निल शिरकर, कुंदन घोसाळकर, तसेच शिवसेना महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top