आमदार संजय केळकर यांची माहिती
मागील आठवड्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतूक शाखा आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाणे स्टेशन परिसरातील वाहतूक समस्यांबाबत पाहणी दौरा केला होता. त्यावेळी श्री. केळकर यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात श्री. केळकर यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना श्री. केळकर यांनी प्री-पेड रिक्षाबाबत माहिती दिली.
ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. प्रधान सचिवांशी याबाबत बोलणे झाले असून सोमवारपर्यंत या योजनेला मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे श्री. केळकर म्हणाले. या योजनेनुसार स्टेशनवर उतरल्यानंतर प्रवाशाने आधी आपल्या गंतव्यस्थळाचे भाडे निश्चित करून पैसे भरायचे आणि त्यानंतर रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशाला रिक्षाचालकाशी भाड्यावर घासाघीस करण्याची गरज राहणार नाही. रिक्षाचालकाकडून मनमानी भाडे आकारणे, प्रवाशाला नकार देणे किंवा गंतव्यस्थळावरून वाद होणे यावर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार असल्याचेही श्री. केळकर यांनी सांगितले.
बैठकीस वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नगरसेवक भरत चव्हाण, अमित सरय्या, अनिता यादव तसेच जयेंद्र कोळी, विशाल वाघ आदी उपस्थित होते. यावेळी अनेक प्रश्न-समस्या उपस्थित करण्यात आल्या. त्यावर अधिकाऱ्यांनी उपाययोजनांची देखील माहिती दिली.
ठाणे स्टेशन परिसरात काही रिक्षाचालकांची अरेरावी, मुजोरी रोखण्यासाठी आरटीओकडून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत चार-चार तास दोन अधिकारी उपस्थित राहतील. त्यामुळे रिक्षाचालकांच्या गैरवर्तनाला आळा बसून वाहतूकही सुरळीत राहील, असे श्री. केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वागळे, कोपरी, इंदिरानगर आदी भागातील वाहतूक समस्यांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्यावर उपाय योजनांची माहिती दिली. अंतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गर्दीच्या चौकांमध्ये कायमस्वरुपी वाहतूक पोलीस उपस्थित राहील, यासाठी पुढील काळात व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितल्याचे श्री. केळकर म्हणाले.


