भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने पडघा बाजारपेठेत राख्यांची दुकाने सजली असून, विविध रंगांच्या आणि आकर्षक डिझाईनच्या राख्यांनी पडघा बाजारपेठ सजली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी महिलांसह नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे.
पडघ्यातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच विविध दुकानांमध्ये राख्यांचे आकर्षक स्टॉल लावण्यात आले आहेत. पारंपरिक राख्यांसोबतच मोत्यांच्या, चंदेरी, कुंदन, कार्टून, फुलांच्या तसेच विविध आकर्षक डिझाईनच्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. लहान मुलांसाठी विशेष कार्टून आणि विविध रंगांच्या राख्यांना मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. रक्षाबंधनासाठी आपल्या भावाला आवडणारी राखी निवडण्यासाठी महिला व मुली मोठ्या संख्येने पडघा बाजारात येत आहेत. राख्यांसोबतच मिठाई, भेटवस्तू, कपडे आणि पूजेच्या साहित्याचीही खरेदी केली जात असल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहकांच्या आर्थिक क्षमतेनुसार बाजारात विविध किमतींच्या राख्या उपलब्ध आहेत. साध्या राख्यांपासून आकर्षक आणि डिझायनर राख्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध असल्याने प्रत्येक ग्राहकाला आपल्या पसंतीची राखी खरेदी करता येत आहे. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण असल्याने या सणासाठी नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधण्यासाठी उत्सुक असून, भावांकडूनही बहिणींना भेटवस्तू देण्याची तयारी सुरू आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पडघा बाजारपेठेत वाढलेली गर्दी पाहता आगामी दिवसांतही खरेदीची लगबग आणखी वाढण्याची शक्यता आहे.
