सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व खडेगोळवली, विठ्ठलवाडी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावार खड्डे पडले असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता या रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे तातडीने व दर्जेदार पद्धतीने बुजविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे.
खडेगोळवली व विठ्ठलवाडी परिसरातील विविध रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे करदाते नागरिक, वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच पादचारी यांना दररोज मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली असून, यापूर्वीही नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागले आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, दुचाकीस्वारांना खड्डे चुकविताना गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच खराब रस्त्यांमुळे वाहनचालक व नागरिकांच्या शारीरिक त्रासातही वाढ होत आहे.
विशेष म्हणजे, दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली केवळ माती, खडी अथवा निकृष्ट साहित्य टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. परंतु काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे निर्माण होतात. त्यामुळे करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होण्याबरोबरच संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात.


