नशा मुक्ती साठी समाजाचे सहकार्य आवश्यक पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे

नशा मुक्त भारत व नशा मुक्त महाराष्ट्र हे अभियान सध्या सर्वत्र सुरू असून. हे अभियान यशस्वी करायचे असल्यास त्यासाठी समाजाचे सहकार्य आवश्यक असल्याची भावना ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी व्यक्त केली आहे. ते भिवंडी येथील नशा मुक्ती जनजागृती कार्यक्रमासाठी आयोजित रिल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, आमदार महेश चौघुले, रईस शेख, महापौर नारायण चौधरी, सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड सह पाची पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस मान्यवर उपस्थित होते.

भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम निमित्ताने नशा मुक्ती अभियान अंतर्गत रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्ष खालील व १८ वर्ष वरील अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक प्राप्त युवकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढले असून त्यामुळे कुटुंब उध्वस्त होत आहेत. त्यामधून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागत असल्याने त्यास पायबंद घालण्यासाठी पोलिस काम करीत आहेत. पण या मध्ये समाजाचा सहभाग महत्वपूर्ण आहे तर हा जगन्नाथाचा रथ ओढणे सहज शक्य होणार असल्याचे सांगत ठाणे पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रात २०२५ मध्ये वर्षभरात २५ कोटी तर २०२६ मध्ये आता पर्यंत ९९ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करीत कारवाई केली असल्याचे शेवटी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी स्पष्ट केले आहे.

Scroll to Top