मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र आदिवासी, कातकरी व गरीब महिलांचे बंद व प्रलंबित e-KYC तात्काळ सुरू करून प्रलंबित सन्मान निधी मिळावा, या प्रमुख मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने शहापूर येथे ‘लाडक्या बहिणींचा मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाला शहापूर तालुक्यातील हजारो लाडक्या बहिणींची उपस्थिती लाभली.
मोर्चाच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील पात्र महिलांच्या विविध समस्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. e-KYC, आधार-बँक लिंक, बँक खाते, मोबाईल क्रमांक तसेच इतर तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. शहापूर तालुका हा अनुसूचित क्षेत्र असून तालुक्यातील अनेक आदिवासी व कातकरी महिला दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये राहतात. इंटरनेट, मोबाईल नेटवर्क, डिजिटल सेवा व बँकिंग सुविधांचा अभाव असल्यामुळे e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे पात्र असूनही अनेक महिलांचा सन्मान निधी प्रलंबित असल्याचे श्रमजीवी संघटनेने सांगितले.
या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील सर्व पात्र महिलांचे बंद व प्रलंबित e-KYC तात्काळ सुरू करावे, प्रलंबित सन्मान निधी तातडीने वितरित करावा, तसेच दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये विशेष e-KYC व बँक समस्या निवारण शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित प्रकरणांसाठी विशेष कालबद्ध मोहीम राबवून प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळेपर्यंत प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणीही करण्यात आली.
मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नावे निवेदने देण्यात आली. सदर निवेदन एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच गटविकास अधिकारी, शहापूर यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्यात आले.
पात्र असूनही केवळ तांत्रिक अडचणींमुळे कोणतीही महिला शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शहापूर तालुक्यातील सर्व पात्र महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली.


